गेली अडीच वर्षे मी धुळ्यात राहतोय; पण धुळ्याबद्दल काही लिहावे म्हटले, तर लिहीण्यासाठी काही शीर्षकच सुचेना... म्हणजे धुळ्यातील माझ्या वास्तव्याचे दोन-चार शब्दांत वा अगदी एका वाक्यातही वर्णन करणे खरंच कठीण आहे.(असंही धुळ्यात कोणतीही गोष्ट करणे सोपे नसतेच, याची मला आता पक्की खात्री झाली आहे.)
तसे पुण्याचे 'अति सौजन्यशील(?)' लोक (मुंबईकरांच्या नजरेतून) पुण्याचे वर्णन 'पुणे तेथे काय उणे' असे करतात; किंवा मुंबईचे 'चंगळवादी' लोक (पुणेकरांच्या नजरेतून) आजच्या दिवशी, उद्या सकाळी पडसाद उमटतील इतकं खा खा खाणे याला 'जिवाची मुंबई' करणे, असे म्हणतात. मग धुळ्याबद्दल एका वाक्यात काय म्हणावे असा प्रश्न मला पडला होता.
इथे आल्यापासून सर्व अनपेक्षित गोष्टींना तोंड द्यायची सवयच लागली आहे. इथल्या लोकांना तिखट पदार्थ खायची आवड आहे; पण माझ्यासारख्या गुळमुळीत स्वभावाच्या व्यक्तींची त्यामुळे फार गैरसोय होते. आदल्या दिवशीच्या तिखट पदार्थांनी सकाळी उठाव करावा, त्यावर उपाय म्हणून आपण धाव मारावी, तर स्वच्छतागृहाच्या नळांनी असहकार आंदोलन पुकारलेले असते. थेंब थेंब पाणी गोळा करून स्वतःला दिलासा देत स्वच्छतागृहाचा दरवाजा हळूच लोटावा,तर ज्यांनी पाणी नसताना आपले काम आटोपलेले असते, त्यांच्या 'खुणा' पाठीच राहून गेलेल्या असतात.समोर एवढा मोठ्ठा अडथळा पाहून उठाव करत असलेल्या जिन्नसांच्या प्रभातफेरीचा मार्ग बदलतो व एक हात तोंडावर आणि दुसरा पोटावर ठेऊन पळ काढावा लागतो. उन्हाळ्यात हैराण होऊन अंगावरचे कपडे थोडे कमी करावेत म्हटले, तर बाहेरचे किडे-किटक अंगावर बसून प्रेमभराने गुदगुल्या करू पाहतात; त्यावर उपाय म्हणून खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करावा,तर आधीच खिळखिळी झालेली काच खळ्ळकन् गळून पडते आणि मग समोर दिसत असलेल्या उजाड माळरानाकडे भकास मनाने पाहण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
इथल्या खाण्या-पिण्याचीही काही औरच बात.. धुळ्यात येण्याआधी मी इथल्या शेवभाजीची फार प्रशंसा ऐकली होती; पण मेसमध्ये भाजीतल्या वाढीव पाण्याने माझ्या तोंडाला पाणी सुटण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही.पापडाइतकी कडक पोळी आणि पोळीइतका नरम पापड खायची सवय मला इथेच लागली. 'पाववडा' आणि 'वडापाव' यातला फरक मी धुळ्यात अक्षरशः अनुभवला. एकदा एका हाॅटेलमध्ये 'चीज सॅन्डविच' ऑर्डर केले असता, ब्रेडला फक्त चीज लावून सर्व्ह केले गेले. वेटरला याबद्दल काही विचारले असता, त्याने 'काय अडाणी पोरगं आहे',वगैरे हावभाव प्रदर्शित करत,"सर, तुम्ही फक्त 'चीज' सॅन्डविच म्हणालात 'वेज्ज चीज' सॅन्डविच नाही."असे उत्तर मिळाले. त्या एका वाक्यात त्याने,'मुकाट्याने खा','जास्त शहाणपणा नकोय' इथपासून ते शेवटी 'भाडखाऊ कुठचा!!' अशी बरीच वाक्ये म्हणाल्याचा मला उगीच भास झाला आणि त्या 'स्वादिष्ट' पदार्थाचा आस्वाद घेण्याच्या भानगडीत न पडता मी मुकाट्याने गिळायला सुरूवात केली.
इथला समाज कष्टकरी लोकांचा आहे.त्यांची भाषाही तशीच रांगडी आहे. मागे गरज पडली म्हणून एका व्यक्तीकडे पेन मागितला असता,"अरे तुम डाक्टर है के मैं? तुम्हारे पास पेन तो होना ही होना..." असे खणखणीत उत्तर मला मिळाले; तेव्हापासून बाहेर पडताना मी एकवेळ चप्पल घालायला विसरतो, पण कनवटीला पेन लावल्याशिवाय बाहेर पाऊलही टाकत नाही. अख्ख्या दुनियेतली लोकं एकतर 'देतात' किंवा 'घेतात';पण इथे मात्र लोक 'देऊन देतात' आणि 'घेऊन घेतात'. आता एकदा 'घेऊन' टाकलेली वस्तू परत कशी 'घेतात',किंवा 'देऊन' कसं 'देतात', असा मला प्रश्न आहे. कधीतरी कोणी जाणकार बुद्धिमान या क्रियापदात क्रियापद मिळवत असलेल्या अद्भुत वाक्यरचनेवर प्रकाश टाकून माझ्यासारख्या क्षुल्लक जीवाला उपकृत करेल,अशी माझी आशा आहे.
धुळ्यातला निसर्ग मात्र अभ्यासाला पोषक व सृजनशीलतेला वाव देणारा आहे.इथल्या रात्रीच्या निरव शांततेने अनेकदा माझ्या विचारशक्तीला चालना दिली आहे. निसर्गाचा विषय निघालाय म्हणून सांगतो, सध्या निसर्गाचे ऋतूचक्र बदलले आहे.एखादी नखरेल मुलगीही लाजेल, इतक्या वेगाने निसर्ग त्याचे रंग पालटतोय. चार महिन्यांऐवजी चार-चार दिवसांत उन्हाळा, पावसाळा,हिवाळा असे ऋतू बदलताना दिसतात.
वरील वर्णनास अनुसरून, फक्त अडीच वर्षे इथे राहिलेलो असलो, तरी 'मी धुळ्यात अनेक पावसाळे पाहिले आहेत,असे मी छातीठोकपणे म्हणू शकतो', या आत्मगौरवपर वाक्याने मी माझी ही 'धुळवड' आटोपती घेतो.
लेखनसीमा !
©डॉ. सागर पाध्ये
©डॉ. सागर पाध्ये
(माझ्या हॉस्टेलवरील वास्तव्यात २०१५ साली लिहिलेला लेख )
Interesting.
ReplyDelete