Sunday, 18 April 2021

दृष्टी आणि दृष्टिकोन


गेल्या शतकभरात विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली, त्याबरोबर एकूणंच अणूपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक पदार्थाकडे पाहण्याची आपली दृष्टी विस्तारत गेली आणि दृष्टिकोन बदलत गेला.


भारतात आर्यभट्ट-भास्कराचार्यांपासून चालत असलेली संशोधनपरंपरा मधल्या काळात खुंटली आणि दुसरीकडे सतराव्या शतकापासून पाश्चात्यांनी आधी गणित आणि मग भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या तिनही क्षेत्रांत हातात हात घालून एकापाठी एक उत्तुंग शिखरं गाठली. 


साधारण तेराव्या शतकापासून माणूस भिंगांचा वापर करत असे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून सुक्ष्मदर्शकांचा वापर सुरु झाला आणि आपल्या नजरेसमोरंच पण नजरेपलीकडचेही एक सुक्ष्म जग आहे, याची जाणीव मानवाला झाली. मानवी पेशी, सुक्ष्मजीव यांबाबतची ही नवीन दृष्टी प्राप्त होऊ लागली, तसा मानवी शरीर आणि आरोग्य यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होत गेला.


शरीराच्या आतमध्ये डोकावून पाहण्यासाठीही विविध तंत्रे विकसित होत गेली. आधी रॉन्टजेन नावच्या शास्त्रज्ञाकडून अपघातानेच एक्स-रे प्रतिमांचा शोध लागला. एक्सरे धातूंना भेदून पलीकडे जाऊ शकत नाहीत. हाडांमध्ये कॅल्शिअम असल्याने एक्स रे फिल्मवर हाडं तेवढी पांढऱ्या रंगाची दिसतात, बाकी सर्व राखाडी, काळ्या रंगाचे दिसते. हाडांची रचना, तुटलेली हाडे पाहणे शक्य झाले. नंतर अशाच प्रकारचे काही द्रव पचनमार्गामध्ये तोंडाद्वारे किंवा गुदमार्गाने पाठवून पचनमार्गाच्या विकारांचं निदान करणं शक्य झालं. अशा द्रवांना 'कॉन्ट्रास्ट एजंट' म्हणतात. आपण त्यांना 'द्रवदूत' म्हणू ! ते शरीरात जाऊन तिथली माहिती आपल्याला पाठवतात म्हणून !


पारंपरिक क्ष किरण अभ्यासाला तरी मर्यादा होत्या. एकतर शरीराकडे कोणत्यातरी एकाच बाजूने बघता येत असे. मेंदू, फुफ्फुसे, हृदय, प्लीहा, यकृत, स्वादुपिंड अशा कितीतरी अवयवांच्या जटील रचना पाहता येत नव्हत्या. पुढे एका विशिष्ट परिघात सर्व बाजूंनी क्ष किरणे सोडून त्यावरून शरीराचे आतील अवयव पाहण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा झाला सीटी स्कॅन ! आता गाजर किंवा टोमॅटोचे आडवे काप घेऊन आतली रचना पहावी त्याप्रमाणे, शरीराची आंतर्रचना पाहणे शक्य होऊ लागले. असा उपयुक्त सीटी स्कॅन विल्यम हाऊन्सफिल्डने बनवला तोपर्यंत १९७२ साल उजाडले होते. यात सुधारणा होत, हाय रिझोल्युशन (High resolution) सीटी स्कॅन (HRCT) तयार झाले. विशेषतः फुफ्फुसांचे आजार अशा पद्धतीने अभ्यासता येतात. यात पुन्हा आपले 'द्रवदूत' वापरले, तर Contrast enhanced CT scan (CECT) तयार होतात. मात्र यात अजूनही शरीरातील मऊ भाग, विशेषतः ज्यांमध्ये द्रवाचे प्रमाण अधिक असते, ते सुस्पष्ट दिसत नव्हते. पुन्हा क्ष किरणांशी संबंध येत असल्याने किरणोत्सर्गाचा धोका वारंवार उद्भवत होता.


दुसरीकडे विज्ञानाचीही वाटचाल चालूच होती. १९३८ साली इसिडॉर राबी या शास्त्रज्ञाने अणुकेंद्रांच्या चुंबकीय अनुनादावर (nuclear magnetic resonance)  संशोधन केलं. एका विशिष्ट चुंबकीय क्षेत्रात अणूकेंद्रे रांगेत उभी राहतात, त्यासोबत थोड्या कमी तीव्रतेचं दुसरं चुंबकीय क्षेत्र काटकोनात निर्माण करून त्याची तीव्रता कमी-जास्त करत राहायची, की या केंद्रांची शिस्त बिघडते, ज्यावेळी ही केंद्रके आपली जागा सोडतात, त्यावेळी त्यांच्या पाऊलखुणा विद्युतचुंबकीय लहरींद्वारे ओळखता येतात. या लहरी चरबी, पाणी अशा प्रत्येकासाठी भिन्न असतात. त्यामुळे निराकार वाटणाऱ्या लहरींना आपल्याला समजेल असे, साकार स्वरुप देणे शक्य होते. म्हणजे असं पहा, एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकांनी मुलांना रांगेत उभं करून ठेवलं आहे, पण एखादा वात्रट आडदांड मुलगा मध्येच रांगेतून उभा आडवा पळतो; आता सारीच मुलं गोंधळतात, जागा सोडतात, पण त्यांच्या पायांच्या ठशावरुन आधी रांग कशी होती हे हे ठरवायचंय, कोण विद्यार्थी कुठे उभा होता हेही ठरवायचंय ! म्हटलं तर इतकं सोपं, नाहीतर फारंच कठीण काम ! या संशोधनाच्या उपयोजनाबद्दल फेलीक्स ब्लॉच आणि एडवर्ड पर्सेल या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालं.


मात्र या संशोधनाचा उपयोग पूर्वी निर्जीव वस्तूंच्या रचना अभ्यासण्यासाठी होत होता. तंत्र अगदीच बाल्यावस्थेत होतं आणि मानवी शरीरासाठी याचा वापर करण्याची कल्पना सुचायला आणि प्रत्यक्षात यायला आणखी तीस वर्षं लागली. पॉल लॉटेरबर या शास्त्रज्ञाला ही कल्पना एक दिवस जेवता जेवता सुचली, त्याने ती सरळ आपल्या टेबल नॅपकीनवर खरडली आणि पुढे संधी मिळताच संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठातली सारी कामं आटोपली, की पॉल रात्री विद्यापीठातील MRI मशिनसोबत प्रयोग करायचा. त्याने आधी एका शिंपल्याच्या अशा प्रतिमा मिळवल्या, त्यानंतर पाण्याचीच दोन वेगवेगळी द्रावणे तयार करून त्यांच्या प्रतिमा मिळवण्याच्या प्रयत्न केला आणि ह्यात बऱ्यापैकी यश मिळवलं. पॉलला मिळालेल्या प्रतिमांमधून दोन भिन्न द्रावणांमध्येही फरक करणं शक्य होत होतं. आजपर्यंत हे कोणालाही जमलं नव्हतं. पॉलने हे संशोधन 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकापर्यंत पोहोचवलं खरं, पण त्यांनी या संशोधनास सरळ कचऱ्याची पेटी दाखवली. अर्थात पॉल काही निराश झाला नाही. अखेर 'नेचर'लाच हे संशोधन प्रसिद्ध करावं लागलं.


पॉलला यश मिळालं असलं, तरीही त्यात सुधारणा करण्यास पुष्कळ वाव होता. इथे आपल्या कथेचा आणखी एक नायक समोर येतो - पीटर मॅन्सफिल्ड ! लंडनमध्ये जन्माला आलेल्या पीटरची सुरुवातीची काही वर्षे दुसऱ्या महायुद्धामुळे बरीच आबाळ झाली. थोडा स्थिरस्थावर झाल्यावर शाळेत प्रवेश घेतेवेळी प्राथमिक गुणवत्ता परीक्षेत नापास झाल्याने पीटरला प्रवेश नाकारला गेला. त्यानंतर दुसऱ्याच एका शाळेत त्याने प्रवेश घेतला. पंधराव्या वर्षी तिथल्या शिक्षकांनी 'विज्ञान' हे तुझ्यासाठी नाही, असं सांगून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मग काहीकाळ इथेतिथे कामं करून, दोन वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन पीटर परत आला. रात्रशाळेत जाऊन अभ्यास करता करता त्याने लंडनच्याच क्वीन मेरी महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पुढे पीटरने पॉलच्या संशोधनात काही मुलभूत बदल घडवले. MRI तयार करण्याची प्रक्रीया अधिक वेगवान झाली. विद्युतचुंबकीय लहरींचा गुंता सोडवून त्याची प्रतिमा तयार करण्यासाठी पीटरने 'फॉरिअर ट्रान्सफॉर्मेशन' या गणितीय पद्धतीचा वापर केला आणि अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळू लागल्या. आता शरीरातील मऊ अवयव पाहता येणे शक्य झाले. सीटी स्कॅनपेक्षाही अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळू लागल्या. यथावकाश पॉल लॉटेरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड अशा दोघांनाही नोबेल पारितोषिक मिळालं.




अगदी गणिताचाही वापर मानवी जीवनाच्या कल्याणासाठी कसा होत गेला, याचं हे संशोधन म्हणजे उत्तम उदाहरण ! आज वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेली मुलं पहिल्याच वर्षात फिजिओलॉजी (शरीरक्रियाशास्त्र) आणि बायोकेमिस्ट्री (जीवरसायनशास्त्र) असे दोन विषय शिकतात, हे दोन्हीही विषय म्हणजे अनुक्रमे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांच्या उपशाखाच ! यातली कुठलीही शाखा वैद्यकक्षेत्रापासून वेगळी करता येत नाही. उलट त्यांच्या उपयोजनातून जी दृष्टी प्राप्त होते, त्यातून आपला दृष्टीकोन मात्र विस्तारत जातो.


हृदयाच्या ठोक्यांपासून ते आतड्यांच्या चलनापर्यंत शरीराच्या अवयवांचे हे चलवलन म्हणून बदलत्या विद्युतभारांचा खेळ असतो, हे आपल्याला अभ्यासातून कळले. अगदी ऋण ऐंशी-नव्वद ते धन ऐंशी मिलीव्होल्ट इतके विभवांतर शरीर खेळवत असते, असं भौतिकशास्त्र सांगू लागले. त्यांचे नियमन म्हणजे खंडीभर रसायनांचा पकडापकडीचा खेळ, हे रसायनशास्त्राने दाखवून दिले. या रसायनांचाच अभ्यास करून आपण रक्ताच्या चाचण्या करतो. अमकीतमकी टेस्ट करून या असं सांगण्यापूर्वी अमुक रसायन शरीरात कुठे निर्माण होतं, ते कुठे जातं, कुठल्या पेशींची दारं ठोठावतं, हे सारं डॉक्टरांना माहीत असतं (काहीजण माहीत नसतानाही खंडीभर टेस्ट्स लिहून देतात, आणि करून घेतात तो भाग वेगळा !) तसंच एखादा अवयव पाहण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे यापैकी काय वापरावं, हे सांगण्यासाठी शरीररचनेसोबतंच त्यापाठचं भौतिकशास्त्रही जाणून घेणं गरजेचं असतं.


मी MBBSला प्रवेश घेतला तेव्हापासून 'तुझी पॅथी काय ?' हा मला सर्वाधिकवेळा विचारलेला प्रश्न ! त्यावर माझी कोणतीही पॅथी नाही, हे माझं ठरलेलं उत्तर ! विस्फारलेल्या डोळ्यांनी मग समोरचा, अरे MBBS म्हणजे 'अॅलोपॅथी ना ?' , असं विचारतो. त्यावर मी, 'ह्याट्ट, ते असंच कोणी पूर्वी म्हणत. आमचं असं काही नसतं. जे जे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत गेलं, ते सारं आम्ही स्विकारलं,.जे सिद्ध होईल ते स्विकारू, जे चुकलं ते सोडून देऊ. आमची पॅथी म्हणजे विज्ञान !'


वैद्यकशास्त्राच्या वैज्ञानिक जडघडणीचा एक छोटासा पैलू सांगण्याचा हा प्रयत्न ! विज्ञानाच्या शाखा-उपशाखा एकमेकींशी किती दृढ नाती बाळगून आहेत हे नेमकं सांगण्यासाठी वरची कथा उदाहरण म्हणून सांगितली. ब्रह्मांडाइतकीच मानवी शरीराची गुंतागुंतीची रचना, तिथले नियम ठरवणे म्हणजे कापसाचाच एक एक धागा हाताने विलग करून मांडण्यासारखा आहे. पण तेही काम माणूस हळूहळू करत आहे. कालच्यापेक्षा आजची माहिती सुधारीत आहे, पण त्यासाठी कालचे अज्ञानही मान्य करणे गरजेचे आहे. अज्ञान मान्य करण्यात विज्ञानाचा उगम आहे !


डॉ. सागर पाध्ये


#सफर_विज्ञानविश्वाची

Thursday, 27 June 2019

धुळवड...


गेली अडीच वर्षे मी धुळ्यात राहतोय; पण धुळ्याबद्दल काही लिहावे म्हटले, तर लिहीण्यासाठी काही शीर्षकच सुचेना... म्हणजे धुळ्यातील माझ्या वास्तव्याचे दोन-चार शब्दांत वा अगदी एका वाक्यातही वर्णन करणे खरंच कठीण आहे.(असंही धुळ्यात कोणतीही गोष्ट करणे सोपे नसतेच, याची मला आता पक्की खात्री झाली आहे.)

तसे पुण्याचे 'अति सौजन्यशील(?)' लोक (मुंबईकरांच्या नजरेतून) पुण्याचे वर्णन 'पुणे तेथे काय उणे' असे करतात; किंवा मुंबईचे 'चंगळवादी' लोक (पुणेकरांच्या नजरेतून) आजच्या दिवशी, उद्या सकाळी पडसाद उमटतील इतकं खा खा खाणे याला 'जिवाची मुंबई' करणे, असे म्हणतात. मग धुळ्याबद्दल एका वाक्यात काय म्हणावे असा प्रश्न मला पडला होता. 

इथे आल्यापासून सर्व अनपेक्षित गोष्टींना तोंड द्यायची सवयच लागली आहे. इथल्या लोकांना तिखट पदार्थ खायची आवड आहे; पण माझ्यासारख्या गुळमुळीत स्वभावाच्या व्यक्तींची त्यामुळे फार गैरसोय होते. आदल्या दिवशीच्या तिखट पदार्थांनी सकाळी उठाव करावा, त्यावर उपाय म्हणून आपण धाव मारावी, तर स्वच्छतागृहाच्या नळांनी असहकार आंदोलन पुकारलेले असते. थेंब थेंब पाणी गोळा करून स्वतःला दिलासा देत स्वच्छतागृहाचा दरवाजा हळूच लोटावा,तर ज्यांनी पाणी नसताना आपले काम आटोपलेले असते, त्यांच्या 'खुणा' पाठीच राहून गेलेल्या असतात.समोर एवढा  मोठ्ठा अडथळा पाहून उठाव करत असलेल्या जिन्नसांच्या प्रभातफेरीचा मार्ग बदलतो व एक हात तोंडावर आणि दुसरा पोटावर ठेऊन पळ काढावा लागतो. उन्हाळ्यात हैराण होऊन अंगावरचे कपडे थोडे कमी करावेत म्हटले, तर बाहेरचे किडे-किटक अंगावर बसून प्रेमभराने गुदगुल्या करू पाहतात; त्यावर उपाय म्हणून खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करावा,तर आधीच खिळखिळी झालेली काच खळ्ळकन् गळून पडते आणि मग समोर दिसत असलेल्या उजाड माळरानाकडे भकास मनाने पाहण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.

इथल्या खाण्या-पिण्याचीही काही औरच बात.. धुळ्यात येण्याआधी मी इथल्या शेवभाजीची फार प्रशंसा ऐकली होती; पण मेसमध्ये भाजीतल्या वाढीव पाण्याने माझ्या तोंडाला पाणी सुटण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही.पापडाइतकी कडक पोळी आणि पोळीइतका नरम पापड खायची सवय मला इथेच लागली. 'पाववडा' आणि 'वडापाव' यातला फरक मी धुळ्यात अक्षरशः अनुभवला. एकदा एका हाॅटेलमध्ये 'चीज सॅन्डविच' ऑर्डर केले असता, ब्रेडला फक्त चीज लावून सर्व्ह केले गेले. वेटरला याबद्दल काही विचारले असता, त्याने 'काय अडाणी पोरगं आहे',वगैरे हावभाव प्रदर्शित करत,"सर, तुम्ही फक्त 'चीज' सॅन्डविच म्हणालात 'वेज्ज चीज' सॅन्डविच नाही."असे उत्तर मिळाले. त्या एका वाक्यात त्याने,'मुकाट्याने खा','जास्त शहाणपणा नकोय' इथपासून ते शेवटी 'भाडखाऊ कुठचा!!' अशी बरीच वाक्ये म्हणाल्याचा मला उगीच भास झाला आणि त्या 'स्वादिष्ट' पदार्थाचा आस्वाद घेण्याच्या भानगडीत न पडता मी मुकाट्याने गिळायला सुरूवात केली.

इथला समाज कष्टकरी लोकांचा आहे.त्यांची भाषाही तशीच रांगडी आहे. मागे गरज पडली म्हणून एका व्यक्तीकडे पेन मागितला असता,"अरे तुम डाक्टर है के मैं? तुम्हारे पास पेन तो होना ही होना..." असे खणखणीत उत्तर मला मिळाले; तेव्हापासून बाहेर पडताना मी एकवेळ चप्पल घालायला विसरतो, पण कनवटीला पेन लावल्याशिवाय बाहेर पाऊलही टाकत नाही. अख्ख्या दुनियेतली  लोकं एकतर 'देतात' किंवा 'घेतात';पण इथे मात्र लोक 'देऊन देतात' आणि 'घेऊन घेतात'. आता एकदा 'घेऊन' टाकलेली वस्तू परत कशी 'घेतात',किंवा 'देऊन' कसं 'देतात', असा मला प्रश्न आहे. कधीतरी कोणी जाणकार बुद्धिमान या क्रियापदात क्रियापद मिळवत असलेल्या अद्भुत वाक्यरचनेवर प्रकाश टाकून माझ्यासारख्या क्षुल्लक जीवाला उपकृत करेल,अशी माझी आशा आहे.

धुळ्यातला निसर्ग मात्र अभ्यासाला पोषक व सृजनशीलतेला वाव देणारा आहे.इथल्या रात्रीच्या निरव शांततेने अनेकदा माझ्या विचारशक्तीला चालना दिली आहे. निसर्गाचा विषय निघालाय म्हणून सांगतो, सध्या निसर्गाचे ऋतूचक्र बदलले आहे.एखादी नखरेल मुलगीही लाजेल, इतक्या वेगाने निसर्ग त्याचे रंग पालटतोय. चार महिन्यांऐवजी चार-चार दिवसांत उन्हाळा, पावसाळा,हिवाळा असे ऋतू बदलताना दिसतात.

वरील वर्णनास अनुसरून, फक्त अडीच वर्षे इथे राहिलेलो असलो, तरी 'मी धुळ्यात अनेक पावसाळे पाहिले आहेत,असे मी छातीठोकपणे म्हणू शकतो', या आत्मगौरवपर वाक्याने मी माझी ही 'धुळवड' आटोपती घेतो.

लेखनसीमा !

©डॉ. सागर पाध्ये

(माझ्या हॉस्टेलवरील वास्तव्यात २०१५ साली लिहिलेला लेख )